मी का लिहिते आहे कुठपर्यंत लिहिणार , कधी थांबणार , का आणि कोणत्या विषयावर लिहिणार याचे कोणतेही ठोस उत्तर माझ्याकडे नाही . हि सुरवात करताना मी सुद्धा स्वताला खूप सगळे प्रश्न विचारते आहे आणि प्रामाणिकपणे उत्तर देते आहे.
सांगायचेच झाले तर विशेष असे काही नाही पण मनातले विचार खरडायला रोजनिशी (diary) ची पाने अपुरी पडत होती म्हणून , जे काही कधी-मधी मनात डोकावते सूत्रबद्धपणे मांडता यावे म्हणून किंवा मांडता येते का ते पहावे म्हणून, कधीतरी लिहिलेले कुठेतरी उतारवयात परत निवान्तपणे वाचताना आपला प्रवास, आठवणी तजेलदार होऊन डोळ्यासमोर तरळव्यात म्हणून , स्वताला थोडेसे चाचपून बघावे आणि स्वतापुरते जगताना आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा आपल्याला काही विचारपूर्वक निकष लावता येतो का हे बघावे म्हणून आणि मग माणुस म्हणून आधी आपण स्वत:ला तरी ओळखावे म्हणून, माझा स्वतःशी सुरु असलेला संवाद आणि संघर्ष मला तरी उलगडतो आहे का हे बघावे म्हणून , फावल्या वेळेचा थोडा चांगला वापर म्हणून , इंग्रजी-डच वाचताना त्याचे translation आपसूकच मराठीत होते म्हणून आणि ते मराठीतूनच जास्त कळते म्हणुन , व्यक्त करायला हे हक्काचे ठिकाण असू शकते म्हणून , कुठेही काहीही वाचले बघितले कि ते कधी मनाला भिडते कधी टोचते आणि मग जे विचार येतात ते स्वताला तरी नेमक्या शब्दात सांगावेत किंवा सांगता येतात का ते बघावे म्हणून , कधी मन फारच संवेदनशील, कधी हळवे तर कधी कठोर , कोरडे बनते त्याचे उगमस्थान शोधावे म्हणून आणि जमलेच तर वाटलेले, जाणवलेले आणि खरडलेले सगळे काही कधीतरी लोकांपर्यंत पोहोचवण्याची हिम्मत करता यावी म्हणून आणि त्यानिमित्याने बाकी मंडळींचे लिखाण, कलाकुसर , प्रतिक्रिया वगैरे बघण्याचा समजून घेण्याचा योग येऊ शकतो म्हणून , माझ्या पेन्टिंग मधील , कवितेतील आणि माझ्या प्रत्येक art मधील किंवा मागची ' मी ' आपल्यात जे काही थोडे फार चांगले आहे ते माझ्यापर्यंत आणि लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून, लोकांच्या गर्दीत पण कधी फार एकटे एकाकी वाटते म्हणून , आयुष्य क्षणभंगुर आहे आता नाही तर कधीच नाही हे जाणवतेय म्हणून कि स्वताच निर्माण केलेल्या कोषातून बाहेर पडता येते का ते बघावे म्हणून , हा खटाटोप, असे म्हणावे का ?
बरेच काही सांगता येईल किंवा कदाचित काहीच मांडता येणार नाही . मलाच समजत नाहीये मला नक्की काय म्हणायचे आहे ते आणि जे म्हणते आहे ते तरी मला तसेच म्हणायचे होते का ते , मला तरी ते तसेच अभिप्रेत आहे का ते !
त्यामुळे, कसे आणि कितपत जमेल ते या क्षणी नक्की सांगता येणार नाही. काहीही, कसेही जसे जमेल तसे लिहेन, विषयाचे बंधन नसलेले ,कधी अगदी वरवरचे तर कधी मनाच्या आत खोलवर दडलेले…. कधी वाचण्याजोगे तर कधी कागदाचा बोळा किंवा फार फार तर कागदाची नाव करण्याजोगे….बुडण्याआधी काही काळ तरी तरंगेल पाण्यावर...